चल रे भोपळया टुणुक टुणुक

निवेदक :- एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्‍या गावाला. रस्त्यात होतं एक घनदाट जंगल. चिक्कार झाडं होती त्यात मोठ मोठाली. प्रचंड वड, पिंपळ, आंबा, फणस अशा किती तरी प्रकारची. एव्हढी दाटी होती झाडांची की दुपारीसुद्धा ऊन जंगलात उतरत नसे. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत बघा काय झालं ते!

कोल्हा :- ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’.

निवेदक :- पण म्हातारी होती हुशार.

म्हातारी :- ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूप-रोटी खाते, जाड जूड होते, मग मला खा.’

निवेदक :- कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुढे निघाली.

[आता तिला वाघ भेटतो. वाघ डरकाळी फोडतो.]
वाघ :- ‘म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो’.

म्हातारी :- ‘मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते, तूप-रोटी खाते, जाड जूड होते, मग मला खा.

निवेदक :- ‘ वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली. लेकीकडे ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठ-मुठ्ठ झाली.

म्हातारी :- आता मला जायला हवं. ४ दिवस राहिले. मला खूप बरं वाटलं. आता जाते. जगले वाचले तर पुन्हा भेटू.

लेक : – आई, असं का बोलतेस?

निवेदक :- मग म्हातारीनं सगळी हकीकत सांगितली लेकीला.

लेक :- हात्तिच्या! एव्हडंच ना? मी करते एक युक्ती.

निवेदक :- लेकीने एक मोठा भोपळा घेतला. तो पोखरला आणि त्यात आपल्या आईला बसवलं नि दिलं पाठवून.

म्हातारी :- ‘चल रे भोपळया टुणुक टुणुक’

निवेदक :- भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला.

वाघ :- ‘म्हातारे, म्हातारे थांब!’

म्हातारी:- ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’.

[त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.]

कोल्हा :- ‘म्हातारे, म्हातारे थांब!’

म्हातारी:- ‘कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक’.

[त्याबरोबर पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. आणि लवकरच घरी पोचला.]

निवेदक :- अशी होती म्हातारी हुशार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.